३१ डिसेंबर मल्ल गजानन यशवंत माणिक यांची जयंती.

आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक व मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) आधुनिक भारतात कुस्ती आणि व्यायाम क्षेत्रात क्रांती करण्याचं श्रेय एका मराठी माणसाला जातं.

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ३,००० दंड, ५,००० बैठका व सात तास कुस्तीची मेहनत ते करीत असत

माणिक राव : (३१ डिसेंबर १८७८–२५ मे १९५४). आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक व मल्ल. पूर्ण नाव गजानन यशवंत माणिक (ताम्हणे). त्यांचा जन्म बडोदे येथे झाला. उस्ताद जुम्मादादा यांनी त्यांना मल्लविद्येचे धडे दिले. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ३,००० दंड, ५,००० बैठका व सात तास कुस्तीची मेहनत ते करीत असत. अस्थिसंधान, शस्त्रास्त्रविद्या व युनानी वैद्यक यांतही त्यांनी प्रावीण्य संपादन केले. गुरू जुम्मादादा यांनी आपल्या झोपडीवजा आखाड्याचे उत्तरदायित्व माणिकराव यांच्यावर सोपविले व माणिकराव यांनी आपल्या कर्तबगारीच्या बळावर त्या आखाड्यांचे रुपांतर ‘श्री जुम्मादादा व्यायाम मंदिरा’च्या (१९०४) भव्य वास्तूत केले. तसेच त्याला शिवाजी मंदिर, उमा सभागृह, अस्थिसंधानालय, सरस्वती व्यासपीठ आणि जलतरण तलाव यांची जोड दिली. त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमध्ये गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, जोडी, लकडी, बनेटी इ. अनेक देशी खेळ व व्यायामप्रकार यांना विविध पवित्रे देऊन, त्यांचे शास्त्र निर्माण करून, त्यांना सांधिक व्यायामांचे स्वरुप प्राप्त करून दिले. त्यांनी बडोदे येथे ‘कन्या आरोग्य मंदिरा’ ची स्थापना केली व मुलींना व्यायामशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. सैनिकी संचलने व कवायती यांच्यासाठी इंग्रजी आज्ञांऐवजी त्यांनी आज्ञाशब्द तयार केले. बडोद्यातील १९१८ सालच्या फ्ल्यूच्या साथीत व १९२७ च्या महापुराच्या वेळी त्यांनी भरीव समाजकार्या केले. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी क्रांतिकारकांना व्यायाम मंदिरात गुप्त आश्रय दिला, त्यांना शस्त्रविद्येचे धडेही दिले. त्यांनी बडोद्यात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवाजी उत्सव सुरू केले. त्यांच्या समाजकार्याच्या गौरवार्थ बडोदे सरकारकडून त्यांना ‘राजरत्न’ व ‘राजप्रिय’ या पदव्या बहाल करण्यात आल्या. ते आजन्म ब्रह्मचारी होते. भारतीय व्यायामविद्येचे ‘भीष्माचार्य’ म्हणूनही त्यांना गौरवाने संबोधण्यात येते. त्यांच्या शिष्यशाखेत ‘कैवल्यधाम’ चे संस्थापक स्वामी कुवलयानंद, नासिकच्या ‘यशवंत व्यायामशाळे’ चे संस्थापक कृ. ब. महाबळ, दादरच्या ‘श्री समर्थ व्यायाम मंदिर’ चे संस्थापक प्र. ल. लाळे आदींच्या अंतर्भाव होतो. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजवाड्यात त्यांनी भव्य शस्त्रसंग्रह उभारला व त्याचा परिचय करून देणारा प्रताप शस्त्रागार हा ग्रंथही लिहिला. भारतीय व्यायाम (१९४१) हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. बडोदे येथे त्यांचे निधन झाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!