आरोग्यम् धनसंपदा

शुभं करोति कल्याणंम् आरोग्यंम् धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ||१। । 

आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे
  "आरोग्यम् धनसंपदा" ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे..! पैसे मिळवितांना आपली तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का? उलट तब्येत बिघडल्यावर ती चांगली करण्यास अतोनात पैसे खर्च करावे लागेल आणि शारीरिक हानी होईल ती वेगळीच.

        आत्मा, शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित असतं. थोडीशी पाठ, कंबर, डोके दुखी याकडे दुर्लक्ष केलं तर नकळत चिडचिड वाढते, म्हणून तिघांकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. 

            म्हणून आरोग्यम् धनसंपदा या सुविचारातच आपणांस आरोग्याचे किती अनन्य साधारण महत्त्व आहे हे समजते. ज्याप्रमाणे धन अर्थातच पैशाला मनुष्य अतिशय महत्त्व देतो, त्यापेक्षा जास्त महत्त्व आरोग्यास आहे. कारण आरोग्य चांगले असेल तरच मनुष्य सुखी जीवनाचा उपभोग घेऊ शकतो.

        तसेच तुम्ही शाळेतील विद्यार्थी असाल तर तुमचे आरोग्य चांगले असेल तरच अभ्यासात प्रगती करू शकतात. समजा एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्याने भरपूर अभ्यास केला आणि नेमका परीक्षेच्या वेळी आजारी पडला आणि परीक्षा देऊ शकला नाही तर त्याची संपूर्ण वर्षभराची मेहनत वाया जाते. म्हणून आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी आपणास सर्वप्रथम आरोग्य म्हणजे काय? आणि ते कोण कोणत्या घटकांवर अवलंबून असते? हे माहिती असणे अतिशय जरुरीचे आहे.

आरोग्य म्हणजे काय?

        आरोग्य हा शब्द नेहमी आपल्या कानावर पडत असतो. पण याचा अर्थ काय? तर आरोग्य म्हणजे आपले शरीर व मन आणि आत्मा हे तिन्ही उत्तम अवस्थेत असणे होय. म्हणजेच काय तर आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाची वेदना किंवा तक्रार नसणे. अर्थातच सर्व अवयव सुदृढ असणे होय. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे, "आरोग्य म्हणेज केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था होय."

        या व्याख्येत आपण निरोगी असण्याबरोबर आपण आपल्या समाजात गुण्या-गोविंदाने, आनंदाने सर्व कार्य सुरळीतपणे पार पाडले पाहिजे. म्हणजेच त्यांस उत्तम आरोग्यवान माणूस म्हणता येईल. उत्तम आरोग्यवान व्यक्ति होण्यासाठी आपणांस आरोग्य ज्या गोष्टींवर अवलंबून असते, त्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित पालन केले पाहिजे. 

आरोग्य कोण कोणत्या घटकांवर अवलंबून असते?

        आरोग्याचे घटक-आहार, विहार, स्वच्छता, व्यायाम, योग, ध्यान-धारणा, खेळ, विश्रांती, झोप व मनोरंजन होय. त्यांची थोडक्यात माहिती समजावून घेऊ.
  • आपला आहार सकस, चौरस व संतुलित असावा. आपल्या शरीराच्या वाढीसाठी निरनिराळे घटक आवश्यक असतात. ते आपणास या संतुलित चौरस आहारातून मिळतात.
  • आपल्या रोजच्या आहारात वरण-भात, भाजी-पोळी, आमटी, चटणी, कोशिंबीर व फळे यांचा समावेश असावा.
  • विहार म्हणजे आपल्या शरीराचा शारीरिक व मानसिक थकवा घालवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात थोडासा फेरफटका मारावा, जेणेकरून आपणास ताजेतवाने व उत्साही वाटेल.
  • आपल्या उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसराची स्वच्छता देखील राखली पाहिजे. अन्यथा वेगवेगळ्या जंतूंचा शिरकाव आपल्या शरीरात होईल व आपले आरोग्य बिघडेल.
  • त्याचबरोबर विविध प्रकारचे बैठे व मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीर वाढीसाठी मदत होते. उत्साह-जोश वाढतो. रोजच्या रोज ध्यान-धारणा, योग व व्यायाम झेपेल तसे करावेत. त्यामुळे आपणास मानसिक शांती मिळते. तसेच जीवनातील अडचणी अडथळे यावर मात करण्यास मदत होते. सामाजिक बांधिलकी जोपासण्यास वाव मिळतो.
  • शरीरास आवश्यक असलेल्या घटकां मध्ये झोप व विश्रांती देखील महत्त्वपूर्ण आहे. Change of work is rest कामात बदल म्हणजेच विश्रांती होय. यासाठी विविध छंद जोपासले पाहिजेत, आणि झोप साधारणतः 6 ते 7 तास ही आवश्यकच आहे. यासाठी जास्त वेळ टीव्ही पाहणे, मोबाईल हाताळणे शक्यतोवर टाळावेच. लहान मुलांनी तर यावर वेळेचे बंधन पाळूनच मनोरंजना पुरते वापरावे.
  • अतिथंड देशात सूर्यकिरणं अंगावर न पडल्यामुळे जीवनसत्व डीची कमतरता तेथील लोकांमध्ये असते. सकाळी नऊच्या आत अंगावर सूर्यकिरणं पडावीत म्हणतात, पण तेव्हा ऊन नसते, मग हे लोक दुपारचे ऊन अंगावर घेतात.
                 एका महिलेला अंगावर अ‍ॅलर्जीचा बरेच दिवसांपासून फार त्रास होता. अर्थात तिला अ‍ॅलर्जी एका दिवसात आलेली नव्हती. ती महिला डॉक्टरां कडे गेली. डॉक्टर म्हणाले, "प्रदूषण हा एक घटक असला तरी सबंध दिवस ए. सी. लावलेल्या खोलीत बसून काम करणं, शारीरिक व्यायाम नाही, कामाचा ताण, समाजात कमी वावरणं अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत" असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. 

        उपाय सुचवत डॉक्टर म्हणाले, "घरी गेल्यावर घरच्यांबरोबर हास्यविनोद करा. मनाचं आरोग्य बिघडलं तर शरीराचं बिघडतं. त्याचे परिणाम कधी लवकर दिसतात तर कधी उशिरापण दिसतात हे नक्की. आयुष्यातील आव्हानं सहज पेलण्याकरिता, मानसिक, सामाजिक आरोग्य उत्तम राखण्याकरिता वेळ काढून शारीरिक व्यायाम, मन प्रसन्न राहण्याकरिता छंद जोपासा. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींशी संवाद ठेवा" असे उपाय सांगितले. 

        डॉक्टरांचा उपाय त्या महिलेला पटला. आचरणात आणणं अवघड असलं तरी अशक्य नाही हेही तिला माहीत होतंच. तिच्या जवळच राहणाऱ्या मैत्रिणीला तिने, ‘मला मदत कर’ असं सांगितलं. तिलाही थोडे प्रश्न होते. दोघी पार्कमध्ये बसवलेल्या व्यायाम साधनांवर व्यायाम करू लागल्या. मुद्दाम काही वाचून त्यावर आठवडय़ातून एकदा तरी चर्चा करू लागल्या. एखाद्या वेळी बहीण-भावंडांना घेऊन आऊटिंग होऊ लागलं. नकळत दोघींचं मन प्रसन्न राहू लागलं. हळूहळू त्या महिलेच्या अंगावरील अ‍ॅलर्जीज कमी झाल्या. पचनशक्ती, रोग प्रतिकार शक्ती वाढल्या. आयुष्य आनंदी झालं. 

        आपण एखादं महागडं वाहन विकत घेतो तेव्हा त्याचं सव्‍‌र्हिसिंग, देखभाल अगदी डोळ्यात तेल घालून करतो, तशी या आपल्या शरीराची टॅक्स-फ्री संपत्तीची सव्‍‌र्हिसिंग हल्ली केली जात नाही किंवा कामाच्या व्याप्यामुळे वेळच मिळत नाही. 

        ठरावीक वयानंतर गुडघेदुखीचा प्रॉब्लेम बऱ्याच वृद्ध व्यक्तिनां होतो, तसा तो माझ्या मित्राला झाला. त्याचं कारण असं की, माझ्या मित्राने खूप हौसेने पुण्याच्या बाहेर फार्म हाऊस घेतलं होतं. विकएंडला तिथे जाऊन तो खूप काम करायचा. आठवडाभर ऑफिस आणि नंतर हा प्रवास. फार्म हाऊसचं काम पूर्ण करूनच गुडघ्याकडे पाहू असं त्याने ठरवलं. त्याच्या घरच्यांनी त्याचं काही ऐकलं नाही. मित्राला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘‘वेळेवर आलात, औषधं घेऊन चार महिने संपूर्ण आराम केला तर नक्की बरं वाटेल. नाही तर रिप्लेसमेंट हा एकच उपाय शिल्लक राहील.’’ परिस्थितीचं गांभीर्य मित्राच्या लक्षात आलं.

        ‘चार महिन्यांच्या उपायांनंतर दुप्पट जोमाने काम करू! सर सलामत तो पगडी पचास.’ हाच विचार त्याने केला. अर्थात ‘आरोग्यम् धनसंपदा’ हा मंत्र त्याला समजला होता म्हणूनच मित्राने त्याच्या आरोग्य धनाची काळजी घ्यावायास सुरवात केली.

        वरील सर्व घटकांचे काटेकोरपणे आपण पालन केले, तसे वागलो तर आपण समाजचे सुजाण, सुदृढ नागरिक होऊ आणि आपण करत असलेलेल्या प्रत्येक कार्यात यशस्वी तर होऊच पण आपल्या संपूर्ण जीवणात सुद्धा यशस्वी होऊ.
शुभं करोति कल्याणंम् आरोग्यंम् धनसंपदा । शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ||१||

दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन | दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ||||

अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति | इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रुणांच पराभवम्‌ |
मुलेतो ब्रह्मरूपाय मध्येतो विष्णूरुपिण: | अग्रत: शिवरूपाय अश्वत्थाय नमो नम: ||||

दिव्या दिव्या दिपत्कार, कानीं कुंडलें मोतीहार,
 दिव्याला पाहून नमस्कार | दिवा लावला देवापाशी, 
उजेड पडला तुळशीपाशी | माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी ||||

तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळे मध्यान्हात | घरातली ईडापीडा बाहेर जावो |
बाहेरची लक्ष्मी घरात येवो | घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ||||

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!