याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद् भगवद्गीता सांगितली होती !
मोक्षदा एकादशीला दरवर्षी गीता जयंती साजरी करण्यात येते. या दिवसाचे काय महत्त्व आहे जाणून घेऊया.
विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने संपूर्ण जगाला दिला आहे.

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळी वेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते, म्हणूनच थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी असे म्हणले आहे की,' माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे गीता माझे प्राणतत्त्व होय.'
समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा नान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे.
हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील,काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे.
नियतम् कुरु कर्म त्वं कर्म ज्यो ह्रकर्मण:
श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही तुमचे विहित कार्य करा, कारण निष्क्रिय राहण्यापेक्षा कार्य करणे चांगले आहे. तुझ्या निष्क्रियतेमुळे या शरीराचा आणि या जीवनाचा हेतू साध्य होणार नाही.यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवतारो जनः से यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते
महापुरुष जे काही आचरण करतात ते आचरण सामान्य लोक आदर्श मानतात आणि त्याचे पालन करतात.
तानि सर्वाणी संयम युक्त आसित मतपर: वशे हि यस्येंद्रियानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठा
श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे. जो व्यक्ती आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, त्याची बुद्धी स्थिर राहते.