माजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
शांताराम राजेश्वर पोटदुखे (३० जानेवारी १९३३ - २३ सप्टेंबर २०१८) हे भारतीय राजकारणी आणि भारताचे संसद सदस्य होते. पोटदुखे सलग चार वेळा लोकसभेचे सदस्य होते; भारताच्या 7 व्या , 8 व्या , 9 व्या आणि 10 व्या लोकसभा. त्यांनी महाराष्ट्राच्या चंद्रपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकीय पक्षाचे सदस्य होते .
शांताराम पोटदुखे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर येथे झाला. हिस्लॉप कॉलेज आणि नागपूर विद्यापीठातून त्यांनी अनुक्रमे बीए आणि बीजे पदवी संपादन केली. पोटदुखे यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पत्रकार म्हणून काम केले.
राजकारणात राहूनही अजातशत्रू अशी ओळख निर्माण करणारे, विरोधकांशी मैत्री जोपासत मतभेदाला मनभेदाकडे जाऊ न देण्यासाठी आटापिटा करणारे, अशी शांताराम पोटदुखे यांची ओळख होती. ऐंशी व नव्वदच्या दशकात चंद्रपूरचे सलग चारदा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे पोटदुखे हे ‘इंदिरानिष्ठ’, पण त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपद भूषवले ते मात्र नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात. मूळचे पत्रकार असलेले शांतारामजी राजकारणात स्थिरावले. हे क्षेत्र सभ्य माणसांचे आहे, यावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यांनी कधीही कुणावर अनुचित टीका केली नाही. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवून राजकारणाचा श्रीगणेशा करणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांना गुरू मानत ते त्यांच्या याच स्वभावामुळे! १९९६च्या पराभवानंतर त्यांनी राजकारणातून जवळपास निवृत्तीच घेतली, पण सार्वजनिक जीवनातील त्यांचा वावर अखेपर्यंत कायम होता. चंद्रपूर व गडचिरोली या दोन मागास जिल्ह्य़ांच्या शैक्षणिक विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले.