भारतीय स्वातंत्र्य सेनानी वासुकाका गणेश जोशी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
वासुदेव गणेश जोशी यांचा जन्म 28 एप्रिल 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील वेटजवळील धोम येथे एका मध्यमवर्गीय देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील गणुकाका जोशी हे पुजारी, शेतकरी, व्यापारी आणि सावकार होते. हे कुटुंब मूळचे औरंगाबादचे आहे. वासुकाकांना तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या.
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजगोपालचारी, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि इतर महनीय व्यक्तींच्या अनेकविध चळवळीत ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तसेच स्वतःकडे कोणतेही श्रेय न घेता आपले जीवन सत्तर वर्षांहून अधिक काळासाठी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी समर्पित केले ते म्हणजे क्रांतीकारक वासुकाका जोशी. लोकमान्य टिळक यांचे परराष्ट्रमंत्री असे त्यांना संबोधले जायचे.
स्वातंत्र्य लढ्याबरोबरच वासुकाका जोशी यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी उपलब्ध होणार्या सर्व साधनांचा आणि मार्गाचा वापर त्यांनी केला. ज्या काळात भारतामध्ये साधी लाठीसुद्धा वापरण्यास आणि घरात ठेवण्यास इंग्रज शासनाची बंदी होती, त्या काळात भारत देशाची गुलामगिरीतून सुटका व्हावी, म्हणून त्यांनी देशभक्तीसाठी वेगवेगळ्या आंदोलनाबरोबरच मळलेली वाट सोडून गुप्त राजनीती व क्रांतीकारितेचा काटेरी रस्ताही अंमलात आणला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी रक्त सांडल्याशिवाय पर्याय नाही, ही विचारधारा विशेषतः त्यावेळचा मुंबई प्रांत आणि बंगाल प्रांत यामधील क्रांतिकारकांच्या मनात खोलवर रुजली होती. हातात कोणतेही शस्त्र न घेता सशस्त्र क्रांतीच्या चळवळीला लोकमान्य टिळक आणि वासुकाका जोशी यांनी हातभार लावला.
रँडच्या खुनानंतर १८९७ मध्ये लोकमान्य टिळक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अटक झाली. त्या वेळी कोर्ट-कचेरीच्या खर्चासाठी जीवाचे रान करून पैसे जमा करण्यात वासुकाका जोशी यांचा सिंहाचा वाटा होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अखिल भारतीय पातळीवर देशाचे पहिले नेते म्हणून लोकमान्य टिळक यांनाच मान्यता होती. सर्व प्रदेशातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्यांचे नाव पोचले आणि सर्वच भागात ज्यांना अनुयायी लाभले त्या लोकमान्य टिळक यांच्यामुळे महाराष्ट्राचे नावही सर्वतोमुखी झाले. इतिहासात टिळक युग म्हणूनच याची नोंद झाली.
लोकमान्य टिळक व वासुकाका यांचा ४० वर्षे संबंध होता. टिळकांच्या प्रत्येक चळवळीत त्यांनी भाग घेतला, नंतरच्या काळात २४ वर्षे ते महात्मा गांधींशी जोडले गेले. ९० व्या वर्षी १२ जानेवारी १९४४ रोजी निधन होईपर्यंत ते स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत होते. अर्वाचीन इतिहासात नोंद असणार्या एका थोर व कर्तृत्वसंपन्न व्यक्तीस भारत स्वतंत्र झाल्याचे बघण्याचे भाग्य लाभले नाही; पण त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अविस्मरणीय आहे.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |