महान समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
विठ्ठल रामजी शिंदे (जन्म : जमखिंडी, २३ एप्रिल १८७३; - २ जानेवारी १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हणले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.
मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महर्षी शिंदे व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यांसाठी राजकीय हक्कांवरून मतभेद होते.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |