धार्मिकता, श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतिक 144 वर्षा नंतरचा अनोखा क्षण "प्रयागराज महाकुंभ मेळा 2025 " सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा भारतात सुरु आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात.
प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. या कुंभमेळाव्यातील पहिले शाही स्नान 13 जानेवारी म्हणजे आज पार पडणार आहे. तर दुसरं शाही स्नान 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी असेल. यानंतर तिसरं स्नान 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येदिवशी होईल.
प्रयागराज महाकुंभ किंवा १२ वर्षांनी येणारं पूर्णकुंभाचे पर्व आहे. या उत्सवाचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये सापडतो. हा उत्सव पृथ्वीवरील मनुष्य जन्मातील सर्वात मोठा मेळावा आहे. सनातन हिंदू धर्मातील रुढी परंपरा पुराणात तसेच इतिहास आणि प्राचीन लोकांच्या अविरत श्रद्धेने जपलले धार्मिक सणात सापडतात.
"कुंभ" हा संस्कृत शब्द म्हणजेच याचा अर्थ घडा आहे. पौराणिक कथेत म्हटल्या प्रमाणे, देवता आणि असुरांनी समुद्र मंथन केलं. तेव्हा धन्वंतरी अमृताने भरलेला घडा घेऊन प्रकट झाले. असुरांच्या हातात अमृत जाऊ नये, म्हणून इंद्राचा मुलगा जयंत हा घडा घेऊन पळाला. त्याला आणि घड्याला वाचवण्यासाठी सूर्य, त्याचा पुत्र शनी, बृहस्पती (ग्रह गुरु) आणि चंद्र यांनी त्याला साथ दिली. जयंत अमृत घेऊन पळत असताना हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी अमृत सांडलं. जयंत १२ दिवस पळत होता आणि देवतांचा एक दिवस म्हणजे मानवांच्या १२ वर्षांसारखा मानला जातो. त्यामुळे कुंभमेळा सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या सापेक्ष स्थितीनुसार दर १२ वर्षांनी या ठिकाणी साजरा केला जातो. प्रयागराज आणि हरिद्वार येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभ आयोजित केला जातो. १२ वर्षांनी साजरा होणारा उत्सव पूर्णकुंभ किंवा महाकुंभ म्हणून ओळखला जातो. ही चारही ठिकाणं नद्यांच्या काठावर वसलेली आहेत. हरिद्वारला गंगा, प्रयागराजला गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचा संगम, उज्जैनला क्षिप्रा आणि नाशिक-त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी आहे. असं मानलं जातं की, कुंभमेळ्याच्या काळात, ग्रह-ताऱ्यांच्या विशिष्ट स्थितीत या नद्यांमध्ये स्नान केल्याने पापं धुतली जातात आणि पुण्य प्राप्ती होते.
कुंभमेळा हे साधू-संत आणि अन्य पवित्र व्यक्तींच्या भेटीचं ठिकाणही आहे. या मेळ्यातील साधूंचे आखाडे हे विशेष आकर्षण ठरतात. याठिकाणी सामान्य लोक या साधू-संतांना भेटू शकतात.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |