संतश्रेष्ठ श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या अंतरंगातील अत्यंत प्रिय शिष्य, प्रवचनकार, तत्त्ववेत्ते बाबा बेलसरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
केशव विष्णू बेलसरे : (८ फेब्रुवारी १९०९—३ जानेवारी १९९८). तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. त्यांचा जन्म सिकंदराबाद (आंध्र प्रदेश) येथे एका मराठी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील सुशिक्षित परंतु सनातनी वळणाचे होते. त्यांचे वडील डिस्ट्रिक्ट कोर्टात न्यायाधीश होते. घरात असलेली सर्व पुस्तके लहानपणीच त्यांनी पुनःपुन्हा वाचून काढली होती. लहान असूनही श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, दासबोध अशा ग्रंथांची त्यांना ओढ होती. कादंबर्या, गोष्टीरूप कथा त्यांना फारशा आवडत नसत. गीतेचे ७०० श्लोक त्यांनी एका आठवड्यात पाठ केले होते.
बाबांच्या लहानपणी, श्री.भटजीबापू यांनी केलेले भाकीत खरे ठरले. बाबांनी पारमार्थिक उंची गाठली आणि ते महाराजांचे सद्शिष्य झाले. असे असुनही “मी आपल्यातलाच आहे” असे म्हणून आपली योग्यता आणि अनुभवश्रीमंती ते नेहमीच झाकून ठेवत. जीवनात वेगवेगळ्या भूमिका प्रेमाने व कर्तव्यनिष्ठेने निभावणारे ‘बाबा’ हे खरे पांढर्या कपड्यातील ‘संन्यासी’ होते.
जेथे ज्ञान असते तेथे भक्ती नसते, जेथे भक्ती असते तेथे ज्ञान नसते।
नारद महर्षींच्यात दोन्ही होते, तसे तुम्ही आहात॥
शक्ती असते तेथे बुद्धी नसते, बुद्धी असते तेथे शक्ती नसते। मारुतीरायांजवळ दोन्ही होते, तसे तुम्ही आहात॥
विद्वत्ता असते तेथे नम्रता व आज्ञाधारकपणा नसतो, नम्रता व आज्ञाधारकपणा असतो तेथे विद्वत्ता नसते।
आद्य शंकराचार्य व माझा ब्रम्हानंदबुवा यांच्यामधे दोन्ही होते, तसे तुम्ही आहात॥
असे हे कौतुकाचे उद्गार खुद्द श्रीमहाराजांनी बाबांविषयी काढले. यात शंकाच नाही की बाबा श्रीमहाराजांना अतीव प्रिय होते. श्रीमहाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ‘अमानित्वाचा’ अभ्यास केला. श्रीमहाराजांना अतिप्रिय असलेले ‘नाम’ शेवटच्या श्वासापर्यंत घेतले. ३ जानेवारी १९९८ रोजी बाबा अनंतात विलीन झाले.
हे सुद्धा वाचा. "वाचाल तर वाचाल..!" खालील लिंक वर क्लिक करा.
=> श्री केशव विष्णू बेलसरे यांचे जीवन चरित्र.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |