महान संत तुका विप्र यांना समाधी दिनी विनम्र अभिवादन.
संत तुकाविप्र यांचा काळ हा शके १६५० ते शके १७१४ म्हणजेच इसवी सन 1728 ते इसवी सन 1792 हा होता . हा काळ उत्तर पेशवाई म्हणून ओळखला जातो. संत तुकाविप्र हे आपला जन्म कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी असे मानत असत हे त्यांच्या अनेक अभंगातून लक्षात येते. तसेच भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ही त्यांच्या अभंगातून जाणवते. संत तुकाविप्र हे वारकरी पंथाचे होते . पंढरपूरची वारी करीत भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला. संत तुकाविप्र हे जन्माने ब्राम्हण होते त्यामुळे त्या समाजात असलेल्या काही ठराविक परंपरांचेच पालन करत असत. संत हे नेहमीच परंपरेचा धागा न सोडता आणि त्यात न अडकता वाटचाल करत असतात. म्हणूनच जास्त कर्मकांड करणे हे संत तुकाविप्र यांच्या दिनक्रमांचा भाग नव्हता. स्वतःच्या वडिलांच्या श्राद्धाला ब्राम्हणांना जेवण देण्याऐवजी गरजू ब्राम्हणेतर लोकांना अन्नदान करणाऱ्या संत एकनाथ महाराज यांची थोर मातृवंश आणि गुरू परंपरा लाभलेल्या संत तुकाविप्र यांनी देखील कधीही कर्मकांडांचा प्रचार वा प्रसारही केला नाही. वेदांचा अभ्यास करून त्यातील मर्म हे वेद बोलती सकळा | भाव धरा येक भोळा या सोप्या शब्दात मांडले.
संत नामदेव व संत तुकाराम यांनी जगाची उपेक्षा न करता त्याच जगात वावरत जन सामान्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले. अश्या महान संतांचे कार्य पुढे चालवणे या साठी आपला जन्म आहे असे आपल्या अभंगातून संत तुकाविप्र यांनी व्यक्त केले आहे. संत तुकाविप्र यांनी योग विद्येचे संपूर्ण ज्ञान असतानाही त्या मार्गाने जाण्याऐवजी त्यांनी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला. कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे त्यांच्याठायी पक्के होते.
संत तुकाविप्र यांचे साहित्य अद्यापही म्हणावे तेवढे समाजात पोहोचले नाही. संत साहित्याच्या अभ्यासकांनी, समाज-प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार यांनी या संत साहित्याला समाजाभिमुख करण्यासाठी आपापल्या परीने कार्य करायला हवे असे वाटते .
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |