लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री बाळाजी जोशीयांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
जोशी, लक्ष्मणशास्त्री : (२७ जानेवारी १९०१ – ). महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे जन्म. वडिलांचे नाव बाळाजी आणि आईचे चंद्रभागा. त्यांचे वडील बंधू वेणीमाधवशास्त्री आयुर्वेदाचार्य म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे ⇨केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. १९२३ साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली. इंग्लिश भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांचा स्वप्रयत्नाने त्यांनी सखोल व्यासंग केला. १९२७ मध्ये मुल्हेरच्या (नासिक जिल्हा) पंडित घराण्यातील सत्यवती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली असून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मधुकर हे अमेरिकेत गणकयंत्रनिर्मिती करणाऱ्या ‘इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स’ ह्या उद्योगसंस्थेत संशोधन व्यवस्थापक ह्या पदावर आहेत. वाई येथेच राहून शास्त्रीजींनी प्राज्ञ पाठशाळेचे व मराठी विश्वकोशाचे कार्य आणि आपला व्यासंग अखंडपणे चालू ठेवला आहे.
प्राज्ञ पाठशाळेचे वातावरण सनातनी पढिक पांडित्याचे नव्हते. ते पुरोगामी चिकित्सेचे व राष्ट्रीय स्वरूपाचे होते. परिणामतः राष्ट्रीय व सामाजिक आंदोलनांत भाग घेण्याची प्रेरणा या वातावरणातून शास्त्रीजींना लाभली. म. गांधींच्या अस्पृश्यता निवारणकार्यास शास्त्रीजींनी हिंदुधर्मशास्त्राचे पूरक भाष्य तयार करून दिले. १९३० व १९३२ साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना प्रत्येक वेळी ६-६ महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. १९३६ नंतर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीचे ते क्रियाशील सदस्य झाले. १९४८मध्ये हा पक्ष विसर्जित होईपर्यंत ते त्याचे सदस्य होते. १९४० पर्यंत व पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाशी ते एक विचारवंत भाष्यकार म्हणून निगडित आहेत.