भारतामधील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी १८२९ मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. १८४७ मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. पेरी चरण सरकार यांनी १८४७ मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने १८४७ मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली होती.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. इ.स. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च, १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |