चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील एक प्रख्यात कीर्तनकार आहेत. श्री गुरू ह. भ. प. धुंडा महाराज देगलूरकर यांनी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
ह. भ. प. चैतन्य भानुदासमहाराज देगलूरकर हे वेदान्ताचे गाढे अभ्यासक, तसेच विवेकचूडामणी, ब्रह्मसूत्रभाष्य आणि महाभारतासोबत ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवतगीता, श्रीमद्भागवत अशा श्रेष्ठ ग्रंथाचे अभ्यासक असून विसाव्या शतकातल्या तरुण पिढीतील नामवंत कीर्तनकार आहेत. ते वै. धुंडामहाराज देगलूरकर यांचे नातू आहेत.
"ज्ञानेश्वरी आणि काश्मिरी शैव दर्शन" या विषयावर ते पुणे विद्यापीठात मध्ये पी एच. डी. साठी प्रबंध लेखन करत आहेत. सर परशुराम महविद्यालय, पुणे येथे २ वर्षे व्याख्याते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दैनिक सकाळ, सोलापूरचे दैनिक तरुण भारत आदी वर्तमान पत्रांत त्यांची अध्यात्मपर लेखमाला प्रकाशित झाली आहे. साम मराठी वाहिनीवरील "आनंदवारी" या आषाढी वारी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग असतो.
त्यांच्या कीर्तनाने कोजागिरी पौर्णिमेला पंढरपूर येथील रुख्मिणी माता मंदिरातील नवरात्र उत्सवाची समाप्ती होते.
"ज्ञानेश्वरीचे पारायण करणे हा संस्कार आहे, तर प्रत्येक ओवीचा अर्थ समजावून घेणे हा जीवनाच्या उदात्ततेचा भाग आहे. अशा अर्थ समजावून घेण्याला एक प्रकारचे वजन असते आणि त्यातून जीवनाची परिपूर्णताही साध्य होते. कारण मला काय कळते, यावर त्या पदार्थाचे अस्तित्त्व स्वीकारावे की नाही हे ठरते. म्हणूनच डोळ्यांना दिसते त्या पेक्षाही त्या वस्तूचे अस्तित्त्व समजणे आवश्यक असते. अशी त्यांची शिकवण आहे.
"ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नसला तरी ती वाचावी. कारण, ती वाचल्याने जो भाव तयार होतो, त्या भावाला भुलते ती ज्ञानेश्वरी माऊली... आणि मग आपल्या भक्ताला अर्थ समजून देण्याची जबाबदारीही माऊली घेते. संतवाङ्मय आपल्याला जीवनाचे व्यवस्थापन शिकवते. आपल्या आयुष्याला विशिष्ट क्रमाने जगण्याची जी पद्धत आवश्यक असते, ती संतवाङ्मय सांगते. म्हणून संतवाङ्मयाची कास सोडू नये.अशी त्यांची शिकवण आहे.