१४ जानेवारी प्रा. दिनकर बळवंत देवधर यांची जयंती.

4 minute read

भारताचे क्रिकेट महर्षी प्रा. दिनकर बळवंत देवधर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

प्रा. दिनकर बळवंत देवधर (जानेवारी १४, इ.स. १८९२ - २४ ऑगस्ट, इ.स. १९९३) हे मराठी क्रिकेट खेळाडू होते. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात ते संस्कृतचे प्राध्यापक होते.

    जानेवारी १४, इ. स. १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. ते पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकले. १९०६ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी कॅंपमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे नायकपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले.

    देवधरांनी आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध भारतातील प्रथमश्रेणीतील पहिले शतक रचले होते. त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अस्तित्वात नसल्याने हे भारतासाठीचे पहिले कसोटी शतक ठरले नाही. देवधरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने १९३९-४० आणि १९४०-४१ या लागोपाठच्या वर्षांमध्ये रणजी करंडक जिंकला. सातत्याने मोठमोठ्या सांघिक धावा करणाऱ्या महाराष्ट्र संघाने आणि नभोवाणीवरून सामन्यांची वर्णने करणाऱ्या बॉबी तल्यारखानांनी भारतात रणजी स्पर्धा लोकप्रिय केली असे देवधरांनीच आपल्या शतकाकडे या आत्मचरित्रात म्हणले आहे.

भारतातील प्रथम श्रेणीची बाल्यावस्था.

    १८५० च्या सुमारास पार्शांनी झोरास्ट्रियन क्लब स्थापन करून संघटित क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला होता. १८८५ आणि १८८७ मध्ये त्यांच्या संघाने परदेश दौरे केले.

    त्याकाळी पुणे आणि मुंबईत भारतात नोकरीसाठी आलेल्या इंग्रजांचा संघ विरुद्ध पार्शी संघ अशी वार्षिक लढत प्रेसिडेन्सी सामने या नावाने खेळली जाई. १८९५ ते १९०६ या काळात ही स्पर्धा चालली. १९०७ मध्ये हिंदूंचा संघ या स्पर्धेत सामील झाला आणि ही स्पर्धा तिरंगी झाली. १९०९ मध्ये अ‍ॅग्रिकल्चरल कॉलेजविरुद्ध देवधरांनी काढलेले शतक (११७) आणि १९१० मधील कॉलेज क्रिकेटमधील कामगिरी पाहून हिंदू संघातर्फे त्याला आमंत्रण आले. त्यांचा प्रत्यक्ष सामन्यात मात्र समावेश झाला नाही. संघ जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी त्यांना वगळण्यात आले होते. यानंतरही अनेकदा नियम आणि शिरस्त्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना डावलले गेले.

    युरोपियन क्लब ही पुण्यातील पहिली क्रिकेटोत्तेजक सभा होते. त्यानंतर यंग मेन्स क्रिकेट क्लब (वाय एम सी सी) तसेच दी पूना यंग क्रिकेटर्स क्लब (पीवायसी) या संस्था स्थापन झाल्या. देवधर वयाच्या १४व्या वर्षापासून ६४ व्या वर्षापर्यंत पीवायसी कडून खेळले. पीवायसीला आधी तपस्वी क्लब, आगाशे क्लब अशी नावे होती. १९२५ मध्ये हे नाव पीवायसी हिंदू जिमखाना झाले.

    १९१२ मध्ये तिरंगी स्पर्धेत मुस्लिम संघ उतरल्यावर स्पर्धा चौरंगी झाली. १९३० ते ३३ हा अपवाद वगळता (स्वदेशी आणि असहकार चळवळ) १९३६ पर्यंत ही स्पर्धा चालू राहिली. १९३७ मध्ये तीत द रेस्ट (इतरेजन - ख्रिस्त्री, आंग्ल-भारतीय, ज्यू) या संघांची भर पडली आणि १९४२चा अपवाद वगळता १९४५ पर्यंत हे सामने चालले. जातीय वैमनस्यास कारणीभूत होत असल्यावरून १९४६ पासून ही स्पर्धा बंद करण्यात आली.

कारकीर्द

    १९११ मध्ये देवधर पार्शी संघाविरुद्ध पहिला प्रथमश्रेणी सामना खेळले. याच वर्षी भारताचा पहिला संघ परदेश दौऱ्यावर गेला होता. १९१२ मध्ये बी एच्या अभ्यासामुळे देवधर क्रिकेटपासून दूर राहिले. १९१३ मध्ये चुनीलाल मेहतांच्या नेतृत्वाखालील हिंदू संघाने प्रथमतः युरोपियन संघाला नमविले, त्या हिंदू संघात देवधरांचा समावेश होता. नंतर १९२९ पर्यंत सतत ते तिरंगी सामन्यांमध्ये खेळले. त्या काळातील हे एवढेच प्रथमश्रेणीचे सामने होते. त्यातही बाद पद्धत असल्याने संघ पहिल्याच सामन्यात गारद झाल्यास पुढची संधी पुढच्या वर्षीच मिळे.

१९३४ व १९३६ या दोन वर्षांमध्ये देवधर चौरंगी सामन्यांमध्ये खेळले. पंचरंगी सामन्यांमध्ये ते खेळले नाहीत.

पहिले भारतीय शतक.

    प्रवासी एमसीसी संघाविरुद्ध पुण्यात १९२६-२७ च्या हंगामात अखिल भारतीय संघाकडून खेळताना देवधरांनी १४८ धावा काढल्या होत्या. (आपल्या आत्मचरित्रात मात्र देवधरांनी ‘मी बाद झालो त्यावेळी माझ्या १४४ धावा झाल्या होत्या’ असे लिहिले आहे) हा सामना १६ ते १८ डिसेंबर १९२६ असा तीन दिवसांचा होता. भारतात राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मंडळ अस्तित्वातच नसल्याने ही अनधिकृत कसोटी मानली गेली.

    विजयानगरमचे महाराज कुमारनी आमंत्रिक केलेल्या हॉब्ज-सटक्लिफ संघाविरुद्ध कोलंबोत झालेल्या तीन अनधिकृत कसोट्यांमध्ये भारतीय संघात देवधरांचा समावेश होता. पहिल्या कसोटीत त्यांनी नाबाद १०० धावा काढल्या होत्या.

रणजी करंडक

    १९३४-३५ मध्ये पहिल्याप्रथम राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी रणजी स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र पहिल्याच सामन्यात मुंबई विरुद्ध पहिल्या डावातील पिछाडीमुळे गमावला. महाराष्ट्राचे कर्णधार देवधर यांनी ५७ तर कोल्हापूरच्या विजय हजारेंनी ६५ धावा काढल्या होत्या.

    १९३५-३६ मध्ये पुन्हा महाराष्ट्राचा संघ मुंबईकडून परास्त झाला. १९३६-३७ मध्ये वेस्टर्न इंडिया स्टेट्स क्रिकेट असोसिएशन (विस्का)च्या संघाने महाराष्ट्राला पराभूत केले. पुढच्या हंगामात आणि त्याच्या पुढच्यातही.

    १९३९-४० च्या हंगामापासून महाराष्ट्रातील प्रथमश्रेणीचे सुवर्णयुग सुरू झाले. लागोपाठच्या नऊ सामन्यांमध्ये महाराष्ट्राने मोठमोठ्या धावसंख्या रचीत विजय मिळविले. सलग दोन वर्षे महाराष्ट्राने अजिंक्यपद पटकावले आणि महाराष्ट्रियन मॅग्निट्यूड असा नवा शब्दप्रयोग या संघाने भाषेला दिला. ५४३, ६५०, ४८२, ५८१, ६७५, ५१७, ४६० आणि तब्बल ७९८ अशा धावा लागोपाठच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राने उभारल्या.

    १९३२ मध्ये पोरबंदरच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असता देवधरांचे वय चाळीस असल्याचे सांगून त्यांना डावलण्यात आले होते. याच संघातील जमशेटजींचे वय चाळीसच्या आसपास होते आणि सी. के. नायडू ३७ वर्षांचे होते.
  • १९४६-४७ मध्ये प्रो. दि.ब. देवधर प्रथमश्रेणीतून निवृत्त झाले.
  • ८१ सामने, १३३ डाव, १८ वेळा नाबाद, ४५२२ धावा, २४६ सर्वोच्च, प्रतिडाव ३४.०० धावा, ९ शतके, २७ अर्धशतके, ७० झेल.
  • २४६ धावा वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी मुंबईविरुद्ध रणजी करंडकात.

    वैयक्तिक आयुष्यातही शतकवीर ठरलेल्या या क्रिकेटमहर्षीचा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने कालांतराने गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पूर्णाकृती पुतळा उभारला. याच स्टेडियमवर मुंबई-सौराष्ट्र हा अंतिम फेरीचा सामना २४-२-२९१६ रोजी झाला. १९४० मध्ये २४ फेब्रुवारी रोजीच अंतिम सामना सुरू झाला होता. त्यानंतर बरोबर ७६ वर्षांनी पुण्यात रणजी करंडक अंतिम सामना झाला.

    २४ ऑगस्ट, इ.स. १९९३ रोजी (वय १०१ वर्षे २२२ दिवस) त्यांचे पुण्यात निधन झाले. त्यांचे पुत्र शरद देवधर हे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले असून त्यांच्या नावावर एक शतक आहे. तारा, सुमन आणि श्यामा या त्यांच्या मुली राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळलेल्या आहेत.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!