ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.
१९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे.
लोणावळ्या पासून ८ कि. मी. अंतरांवर दुधिवरे येथे १६ एकर जागेत बाबामहाराजांनी आध्यत्मिक केंद्र उभे केले आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार (१९८६), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन तर्फे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार (१९९०), पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र (१९९०), सासवड नगरपरिषदेतर्फे सत्कार (१९९०), महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते मानपत्र (१९९१), सरगम कॅसेट कंपनीद्वारे प्लॅटिनम डिस्क विमोचन आणि तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्य यांच्या हस्ते सत्कार (१९९२), जागतिक मराठी परिषद दिल्ली यांच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार (१९९४) अशा विविध मानपत्रांनी आणि सत्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |