१० फेब्रुवारी जगन्नाथ शंकरशेठ मुरकूटे यांची जयंती.

5 minute read

थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ मुरकूटे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे ऊर्फ नाना शंकरशेट (इंग्रजी लेखन-भेद: Jagannath Shankarsheth) (जन्म : मुंबई, १० फेब्रुवारी १८०३, मृत्यू : मुंबई, ३१ जुलै १८६५) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता.

    जगन्नाथ शंकरशेट यांचा जन्म मुंबईत दैवज्ञ ब्राह्मण सोनार व्यापारी व सावकारी कुटूंबात झाला. पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाणी तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत. 10 फेब्रुवारी 1803 रोजी नाना शंकर शेठ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी व्यापारामध्ये मोठी संपत्ती मिळवलेले होते. त्यामुळे नानांचा बालपण हे अतिशय संपन्न तीमध्ये गेलं. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारासाठी व्हावी या हेतूने त्यांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.

    त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला.एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटे, तथापि ते नाना शंकरशेट या नावानेच अधिक परिचित आहेत. त्यांचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. नाना शंकरशेट यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला. त्यांच्यावर सर जमशेटजी जिजीभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४८) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४९) या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या; १८५७मध्ये, द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल सुरू केले. १८५५मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली. अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेट होते. या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी १८५२मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.

    बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल.

    नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या : रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला रु. ५,०००; व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाला रु. ५,०००; जगन्नाथ शंकरशेट स्कूलला रु. ३०,०००; एल्‌फिन्स्टन शिक्षण निधीस रु. २५,००० आणि जिजामाता (राणीच्या) बागेसाठी रु. २५,०००.

    देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या साऱ्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. १८५७ मध्ये आलेले किटाळ पूर्णतः दूर होऊन त्यांचे कार्य अधिकच चमकले. नानांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.

नाना जगन्नाथ शंकरशेठ यांची पदे.

नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे मुंबई आणि प्रांताच्या विकासासाठी खूप मोलाचे योगदान आहे. त्यांनी भूषविलेल्या काही महत्त्वाच्या पदांची माहिती खालीलप्रमाणे देता येईल.

१) संस्थापक अध्यक्ष - बॉंम्बे असोसिएशन     २) सभासद - बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी 
३) उपाध्यक्ष -स्कुल ऑफ इंडस्ट्रीज              ४) अध्यक्ष - डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट 
५) सदस्य - सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल)     ६) सदस्य - बोर्ड ऑफ एज्युकेशन 
७) सदस्य- नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी         ८) विश्वस्त - एल्फिन्स्टन फंड. 
९) अध्यक्ष - पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती )     १०) संस्थापक - जगन्नाथ शंकरशेठ स्कुल 
११) संस्थापक सभासद - जे. जे. आर्टस् कॉलेज     १२) सदस्य - मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ 
१३) फेलो -मुंबई विद्यापीठ             १४) अध्यक्ष - हॉर्टिकल्चर सोसायटी 
१५) अध्यक्ष - जिओग्राफिकल सोसायटी         १६) डायरेक्टर - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी 
१७) ट्रस्टी - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी         १८) सदस्य - द इनलॅंड रेल्वे असोसिएशन 
१९) संचालक /सदस्य - ग्रेट ईस्टर्न रेल्वे         २०) आद्य संचालक - रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने) २१) संचालक - बँक ऑफ वेस्टर्न इंडिया         २२) संचालक - कमर्शिअयल बँक ऑफ इंडिया 
२३) संस्थापक - द मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया 
२ ४) संचालक/अध्यक्ष - बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना ) 
२५) अध्यक्ष - बादशाही नाट्यगृह 
२६ ) पहिले देशी मॅजिस्ट्रेट १ "जस्टिस ऑफ द पीस", "मुंबईचा अनभिषिक्त सम्राट", "मुंबईचे शिल्पकार" म्हणतात.

ब्रिटिश राजवटीतील वर्णभेद नाहीस झाला पाहिजे असे ते म्हणत.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!