आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
राजे उमाजी नाईक यांचा ७ सप्टेंबर १७९१ साली पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते. ते स्वतःच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्टसन याने १८२०ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?" तर मॉकिनटॉसम्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.
उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखा धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्यांचा कारवाया आणखी वाढल्या. उमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले होते उमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजीराजे नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले.
या धाडसी उमाजीराजेंनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी उमाराजेंचे धोरण डोळ्यासमोर ठेवून ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |