तुळापूर येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी आहे.
तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावाचे पूर्वीचे नाव 'नांगरवास' असे होते. हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे.
या ठिकाणाला इतिहासा सोबतच धार्मिक महत्त्व व निसर्गाची जोड देखील लाभली आहे. भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले व स्वयंभू महादेवाची प्राचीन मंदिरे असलेले, श्री क्षेत्र तुळापूर (Shree Kshetra Tulapur). तसेच स्वराज्यासाठी ऐन तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारे, छत्रपती संभाजी महाराज यांचे हे समाधी स्थळ (Chhatrapati Sambhaji Maharaj Samadhi) देखील आहे.
तुळापूरचे अगोदरचे नाव "नागरगाव" व याच तुळापूर नगरीत एक दुर्दैवी प्रसंग घडला. ह्या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले, तसेच दुःखाचा डोंगर ही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजीराजेंची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजेंनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. स्वराज्याच्या शत्रूना अक्षरशः सळो की पळो केले. परंतु फेब्रुवारी, 1689 साली संभाजी महाराजांना मुघल बादशहा औरंगजेबाने, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले. तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून, येथेच अत्यंत हलाखिने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृणपणे हत्या केली गेली. जवळच, नदीच्या काठावर वसलेल्या वढू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आला.
"आता आपल्याला स्वराज्य सहजपणे गिळता येईल" असे औरंगजेबाला वाटत होते. परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही.
अशा या घटनाक्रमा मुळे तुळापूर व वढू बुद्रुक (Vadhu Budruk) या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ पाहायला मिळतात. अनेक हालअपेष्टा होऊनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस "बलिदान दिवस" म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणाला "बलिदान स्थळ" बोलले जाते. हे ठिकाण आजही स्वराज्य रक्षकांसाठी शक्तीस्थळ आहे.
तुळापूरचे भौगोलिक स्थान आणि लोकसंख्या:
तुळापूर हे पुणे जिल्ह्यातल्या खेड (राजगुरू नगर) तालुक्यातील आळंदी देवाची पासून अवघ्या १२ कि. मी. अंतरावर हवेली तालुक्यात आहे. तुळापूर ८१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणने नुसार ह्या गावात गावात ५१० कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या २६८६ आहे त्यांपैकी १४१० पुरुष आणि १२७६ स्त्रिया आहेत. यांमध्ये अनुसूचित जातीचे लोक २२२ असून अनुसूचित जमातीचे १३६ लोक आहेत. तुळापूरच्या सर्वात जवळचे शहर पुणे हे २४ किलोमीटर अंतरावर आहे. तुळापूरचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६२१० आहे.
तुळापूरचा इतिहास:
शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरवास गावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजी राजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतके सोनेनाणे दान करण्यात आले. तेव्हापासून त्या 'नांगरवासास' 'तुळापूर' म्हणू लागले.